अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या “कृषीशास्त्र विभागाने” आयोजित केलेले मराठवाडा विभाग स्तरीय "समर्थ शेतकरी मांदियाळी" दि.२२-मे-१६ रोजी परळी, जि.बीड येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय श्री.आबासाहेब मोरे (प.पू.गुरुमाऊली यांचे परम श्रध्येय शिष्य तथा सुपुत्र), यांच्या शुभ हस्ते, तसेच जेष्ठ नैसगिक शेतीतज्ञ श्री. दीपक सचदे व स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती लाभलेले आदरणीय श्री.आबासाहेब मोरे यांनी कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, परळी जि.बीड येथील सेवा मार्गाच्या "पर्यावरण प्रकृती विभागातील" वृक्ष संवर्धन व लागवड उपक्रमांतर्गत रोपवाटिकेचे उद्घाटन करून करण्यात आले. या रोपवाटीकेच्या माध्यमातून शेतीसाठी उपयुक्त औषधी वनस्पती, सावली देणारे वृक्ष, काहीउपयुक्त फळझाडे, फुलझाडे, लक्ष्मी प्राप्तीकारक वनस्पती इ.शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
शेतकऱ्यांशी संवाद साधतांना आदरणीय आबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर अनमोल मार्गदर्शन, शेतीसाठी वृक्ष लागवड व संवर्धन, सात्विक व सुसंस्कारित अन्न, मराठवाडयातील विवाह समस्या, हुंडाबंदी, कमी पाण्यावर नैसर्गिक शेतीवर येणारे पिकांची माहिती, प.पू.गुरुमाऊलींचे कृषिविषयक कार्य व आध्यत्मिक शेतीतील उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई. बाबींवर अनमोल मार्गदर्शन केले.
विशेषत: पंचसूत्री कार्यक्रम अंतर्गत आत्महत्यापिडीत, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी आ.आबासाहेबांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच कु.अमोल मुंडे (शेतकरी कुटुंबातील सेवेकरी विद्यार्थी) प.पू.गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने MPSC परीक्षेत १५ वा क्रमांक व चांगल्या पदावर रुजू झाल्याने त्याचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जेष्ठ कृषीतज्ञ डॉ.दीपक सचदे (कृषीतज्ञ) सर्व शेतकऱ्यांना समर्थ करण्यसाठी प.पू.गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून सुरु केलेल्या “समर्थ कृषी विज्ञान” च्या माध्यमातून कृषी विकासासाठी सेवा मार्गाद्वारे सुरु असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. तसेच आपल्या प्रदीर्घ अनुभवातून उपस्तीत शेतकरी प्रतिनिधींना नैसर्गिक शेतीतील तंत्र, रासायनिक शेतीचे तोटे, पिक लागवड पद्धती, बीज संस्कार, अमृतमाती, अमृतपाणी, आदींबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन श्री.दिपकजी सचदे यांनी केले.कार्यक्रमात मराठवाडयातील तसेच विविध गावा-गावातील व जिल्ह्यातील ५००-५५० शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.